आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक राज्यात आणि शहरात नागरिकांनी तिरंगा फडकावून हा दिवस विशेष बनवला आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबवली आहे, ज्यामुळे घराघरांत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले. पंतप्रधानांच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील अकरावे ध्वजारोहण होते. या वेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या वीरांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

विकसित भारताचा संकल्प आणि 2047 चे ध्येय
मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या सुवर्णकाळाची चर्चा केली. त्यांनी सांगितले की, भारताच्या प्रगतीसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे आणि आपण सगळे एकत्र येऊन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवू शकतो. त्यांनी हा सुवर्णकाळ गमावू न देण्याचे आवाहन केले आणि सर्वांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मेडिकल शिक्षणातील मोठी घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी वैद्यकीय शिक्षणासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत 75,000 नवीन मेडिकल सीट्स तयार करण्यात येणार आहेत. यामुळे भारतातील विद्यार्थी देशातच उच्च शिक्षण घेऊ शकतील आणि त्यांना विदेशात जाण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी मागील दहा वर्षांत मेडिकल सीट्सची संख्या 1 लाखांपर्यंत वाढवली गेली आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले की, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक भारतीय विद्यार्थी विदेशात जातात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परंतु, या नवीन योजनांमुळे आता विद्यार्थ्यांना भारतातच दर्जेदार शिक्षण मिळेल. त्यामुळे आगामी पाच वर्षांत 75,000 नवीन मेडिकल सीट्सची भर घालण्यात येईल.
स्वातंत्र्यदिन भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे
- लोकांच्या जीवनात सुधारणा: मोदींनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत होता. परंतु, आज सरकार प्रत्येक घरात पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढली आहे.
- स्पेस सेक्टरमध्ये प्रगती: भारताने स्पेस सेक्टरमध्ये मोठी प्रगती केली आहे. अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि नवीन संधी निर्माण होत आहेत. आज भारतात प्रायव्हेट रॉकेट्स आणि उपग्रह लॉन्च केले जात आहेत.
- मध्यमवर्गीयांचा महत्त्व: पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले आणि 2047 पर्यंत त्यांच्या जीवनातील सरकारी हस्तक्षेप कमी करण्याचे स्वप्न मांडले.
- गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा: मोदींनी सांगितले की, सरकारने 1500 हून अधिक अनावश्यक कायदे रद्द केले आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी न्यायासाठी नवीन कायदे तयार केले आहेत.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्त्व वाढले आहे. सरकारने संशोधनासाठी मदत वाढवली असून, 1 लाख कोटी रुपये संशोधन आणि विकासासाठी दिले आहेत.
सरकारला आपल्या अडचणी कळवा: पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवक, प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, त्यांनी त्यांच्या अडचणींविषयी सरकारला पत्र लिहावे. या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सरकार संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या सर्व स्तरांवरून त्यांना प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने देशवासीयांना नवीन संकल्प आणि योजनांच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. मेडिकल शिक्षणाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा आणि विकसित भारताच्या स्वप्नाची पुनरावृत्ती या स्वातंत्र्यदिनी विशेष ठरली आहे.