आज सकाळी मराठवाडा आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7:14 वाजता आलेल्या या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले. काहींनी घाबरून आपल्या घराबाहेर येऊन उघड्या जागेत धाव घेतली.
भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे हिंगोली, परभणी, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात धक्के जाणवले.

भूकंपाचे धक्के जाणवलेले भाग
हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. विशेषतः पैठण तालुक्यातील पाचोड, जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत या भागात सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले.
दोन महिन्यांपूर्वीही भूकंपाचे धक्के
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याचप्रमाणे, दोन महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
प्रशासनाने घेतली खबरदारी
सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.
भूवैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी
एमजीएम अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक आणि हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी या भूकंपाची तीव्रता अधिक असल्यामुळे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
आज सकाळी मराठवाडा आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड आणि इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असून भूवैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा – वसंत मोरेंचा मोठा निर्णय: 23 पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश…