हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रेल्वेचे १८ डब्बे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे ठिकाण आणि वेळ
हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान भल्या पहाटे ३:४५ वाजता घडला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले आहेत.

मालगाडीला धडक
हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरून घसरल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात आले आहे.
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच रेल्वेचा वेग कमी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले. अन्यथा मृतांचा आकडा अधिक मोठा असू शकला असता.
रेल्वे सेवा ठप्प
या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज, आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटलला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अपघाताची तपासणी
रेल्वे प्रशासनाने या अपघाताची कारणमीमांसा करण्यासाठी तपासणी सुरु केली आहे. यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून, लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
हे ही वाचा – Worli Hit & Run – वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना, ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली